संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव जास्त वाढायला लागलीये. आणि एकेकाळी मी नुसताच ‘मराठी’ आहे म्हणून जे भागत असे ती सोय राहिली नाही. मराठी म्हणजे पुणेकर कि मुंबईकर कि नागपूरकर असा प्रश्न यायला लागला. त्यामुळे मराठी माणसाच्यापुढे स्वपरिचयाचा एक नवाच ‘क्रायसिस’ निर्माण झाला..’क्रायसिस’!
महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जाणं हे न ओळखण्यासारखच आहे,स्वतः स्वतःलाही. महाराष्ट्रात खास व्यक्तिमत्व म्हणजे अशी तीन.एक म्हणजे मुंबईकर,पुणेकर किंवा नागपूरकर. तशी महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्यापुढे ‘कर’ जोडावेत अशी ही तीनच खास स्थळ पुणे,नागपूर व मुंबई.
...आता तुम्हाला मुंबईकर व्हायचंय का? मुंबईकर व्हायचं असेल तर प्रथम तुम्हाला मुंबईत 'जन्माला' येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानीच सोडवायला हवा. एरवी मामला बिकट आहे. रात्री आडवं व्हायला फुटपाथची 'पागडी' देखील आता हजाराच्या आकड्यात गेलीये असं म्हणतात. त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या गावी सुखी राहा. आयुष्यात सगळ्याच महत्त्वाकांक्षा काही पुर्या होत नाहीत. आता मुंबईच्या चाळीत अगर ब्लॉकमध्ये जागा असलेली एखादी मावशी किंवा एखादी आत्या जर तुम्हाला दत्तक घेत असेल तर पहा. दुसर्यांदा जन्माला यायचा हाच एक सोपा उपाय आहे, किंवा मग 'घरजावई' व्हा. 'घरजावई' याचा मुंबईतला अर्थ ज्याला मुलीबरोबर घरही द्यावे लागते असा आहे. राहती जागा असेल तर मात्र मुंबईकर होण्यासारखं सुख नाही,तुम्हाला सांगतो.
'मुंबईत भयंकर गर्दीये' ही तक्रार मुंबईकराखेरीज इतरच लोक जास्त करत असतात. मुंबईतली हवा,गर्दी,डास असल्या गोष्टींना कोणीही कितीही नावं ठेवली तरी त्याला ती खुशाल ठेऊ द्यावीत. कारण मुंबईचा अभिमान बाळगलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.म्हणजे मुंबईकर व्हायला ही अट लागतच नाही. ती पुण्याला, तिथे अभिमान पाहिजे. उलट मुंबईला कोणी जर 'एक भिकार' म्हणत असेल तर आपण 'सात भिकार' असं सांगून मोकळं व्हावं.
पाव्हण्याना चुकवायला हे धोरण अतिशय उपयोगी पडत, कारण इथे काय आहे, 'बाहेरगावच्या पाव्हण्याना चुकवणे' हे धोरण गनिमी काव्यानी चालू ठेवावं लागत. सुदैवानी मुंबई शहरामध्ये बार-मार रोगांच्या साथी चालू असतात.तसाच मोर्चे,घोषणा,बंद ह्यांच्या राजकीय साथीसुद्धा असतात. प्रत्येक पक्षाला दरवर्षी आपआपला बंद यशस्वी करून दाखवावाच लागतो, त्याला ते तरी काय करणार?
तेव्हा पाहुणे येणार असले तर त्यांना 'येऊ नका' असं कळवू नका.
'अवश्य यावे फक्त येताना कॉलरा,देवी व इन्फ़्लुएन्झाची इंजेक्शनं घेऊन यावे. गेल्या आठवड्यात २१४ मृत्यू झाले पण त्याचे विशेष नाही. काविळीची साथ पुन्हा सुरु झाली आहे तरी अवश्य यावे.चि.बाळकुशास आशीर्वाद' हे ही त्याच्या मध्ये घालून ठेवा.
इतकं असून सुद्धा काही चिवट नातलग येतातच. नक्की करतात यायचं. त्यांना 'स्टेशनवरून उतरवून घेण्यास येत आहोत' असे सांगून आणायला जाऊ नये. टेक्सी ड्रायव्हर संघटनेला फोन करून त्यांचा पुढला संप किती तारखेला आहे हे विचारावं आणि त्या दिवशी बोलवावं.
पाहुणे जर प्रथमच येणार असले तर आपण जरी गिरगावात राहत असलो तरी त्याला 'ठाण्यात उतरणे सोयीचे पडेल' असं सांगून मोकळं व्हावं. मुंबईत एकमेव धोका म्हणजे मुक्कामाला येऊ पाहणाऱ्या पाहुण्यांचा, एरवी मुंबई सारखं शहर नाही हो.
मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यात तीनचार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला 'बॉम्बे' म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला 'मुंबई'च म्हणतो. मुंबईत एकदा तुम्ही जन्माला आलात कि मुंबईकर होतच जाता. किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. पण बाहेरून येऊन मुंबईकर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या मराठीमध्ये भूतकाळाला काहीही किंमत नाही हे ध्यानात ठेवा. मुंबईत जसे उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू तसे काळही दोनच,वर्तमान आणि भविष्य. मुंबईला बिचारीला भूतकाळ वगैरे काही नाहीच. तिला फक्त आज आणि उद्या. मुंबईकराला 'शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड काय होता?' यापेक्षा सकाळच्या फास्ट लोकल कुठल्या? याची माहिती अधिक महत्वाची. घड्याळाच्या तासाप्रमाणे मिनिटही मोलाची असतात हे मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही.कारण मुंबईकराचे घड्याळ हे केवळ हाताला बांधलेले नसून त्याच्या नशिबाला बांधलेलं असतं. पण मुंबईमध्ये मुंबईकर होणं हे काहीही सक्तीचं नाही. हा ऐच्छिक विषय आहे.
पुण्यात मात्र पुणेकर होणं हे सक्तीचं आहे.
घड्याळ आणि गर्दी यांच्याशी जुळवलं आणि चाळीत जर राहत असाल तर 'चाळीस बिर्हाडात मिळून एक' अशा संडासापुढे शांत चित्ताने वाट पाहण्याची अशी जर तुम्ही योगसाधना केलीत कि माणूस मुंबईकर झालाच.
मुंबईला पुण्यासारखा इतिहास नसेल पण खर्या मुंबईकराचं भूतकाळाविषयीचं प्रेम फक्त एकाच बाबतीत उफाळून येतं ते म्हणजे क्रिकेट.कारण मुंबईमध्ये क्रिकेट हा एकच 'खेळ' मानला जातो. इतर शहरात हा खेळ मैदानी वगैरे आहे,पण मुंबईतल्या चाळीच्या ग्यालरीत टेस्ट म्याचेस वगैरे चालतात. शिवाय क्रिकेट समजायला हातात ब्याट-बॉल घेतलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.ही समजूत अगदी चुकीची आहे. क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथे मात्र क्रिकेटच्या इतिहासात तयार असणं अतिशय आवश्यक आहे. अस्सल मुंबईकर ''अवो,ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठशी झाली वो?'' असा प्रश्न विचारून एखाद्या पुणेकराला फेफड आणील.पण त्याला क्रिकेटचा इतिहास विचारा. एखाद्या पुणेकराने बाजीराव,सवाई माधवराव,त्रिंबकी डेंगळे वगैरे नावं फेकावीत ना तसे पी.विठ्ठल,पी.के.नायडू, विजय मर्चंट इथपासून नावं फेकीत फेकीत वाडेकर,सोलकर,हा आपला गावस्कर इथपर्यंत हा हा म्हणता सगळे येऊन पोहोचतात.तेव्हा मुंबईकर व्हायचं असेल तर,'हर हर ती पेशवाई गेली आणि ब्रह्मविद्या गेली' या थाटामध्ये 'हर हर त्या क्वाडल्यामिरर्स गेल्या आणि क्रिकेट खल्लास झाला.' हे वाक्य म्हणावं लागेल.
अस्सल मुंबईकर आणि इंग्रजांचा खरा ऋणानुबंध होता. कारण,मुंबईवर मुसलमान किंवा मराठे यांपैकी कोणाचंच राज्य नव्हतं.एक तर मुंबईच नव्हती,ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर.त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच.टिळक,गांधी या मुंबई बाहेरून आलेल्या लोकांनी उगीचच मुंबईकर आणि साहेब यांचे संबंध बिघडवले.अस्सल मुंबईकराला फोर्ट मधल्या जुन्या इमारती पाहून असं भडभडून येत...'काय साहेब होता.'
मुंबई ही मुंबईला मुंबई म्हणणार्यांचीच. मुंबई बाहेरून आलेल्या मराठी लोकांनी मुंबईची भाषा बिघडवली. अहो 'चाय पिली' असं म्हणायच्या ऐवजी 'चहा घेतला' म्हणाय लागले.काय हे..
तात्पर्य, पेशवे आणि टांगे गेले तरी पुण्याचं 'पुणेरीपण' सुटलं नाही पण मुंबईची ट्राम गेली आणि अस्सल मुंबईकर अगदी हळहळला.'साली निदान ती सहा नंबरची ट्राम तरी ठेवायला पाहिजे होती.' या उद्गारामागचा तो काही कळवळा आहे ना तो नव्या मुंबईकराला कळणार नाही.
...आता तुम्हाला पुणेकर व्हायचं का? जरूर व्हा.आमचे काहीही म्हणणे नाही.पण मुख्य सल्ला असा, कि पुन्हा विचार करा. अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे.आणि एकदा तयारी झाली कि त्यासारखी मजा नाही,तुम्हाला सांगतो.
पहिली गोष्ट म्हणजे कसलाही न्यूनगंड बाळगू नका.आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका.म्हणजे आपण कोण आहोत,आपला शैक्षणिक दर्जा काय,एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.विषय कुठलाही असो,म्हणजे आता 'अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?' या विषयावरती आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत,उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला,हे विसरून मत ठणकावता आलं पाहिजे.अमेरिकेची आर्थिक आघाडी-ठोका.
दिवसातून एकदा तरी ''चक् चक् पूर्वीचे पुणे राहिले नाही,पूर्वीचे पुणे राहिले नाही.'' हे म्हणायलाच पाहिजे.हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही.इथे म्हणजे दहा वर्षांचा मुलगासुद्धा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडे असल्यासारखं ते चारचौघांपुढे उघडत असतो.त्यामुळे ''चायला आमच्या वेळी हे असंल नव्हत.'' हे वाक्य कॉलेज,कचेरी,ओंकारेश्वर,पेंशनर मारुतीची टेकडी,मंडई आणि शिशुविहार, कुठेही ऐकायला मिळेल ''आमच्या वेळी ते तसं नव्हत.!''
मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. त्यात शुद्ध मराठी या नावाची एक पुणेरी बोली आहे.आता ह्या बोलीमध्ये व्यासपीठावरची पुणेरी,घरातली पुणेरी,दुकानदाराची पुणेरी,ह्यातला फरक नीट समजावून घेतला पाहिजे.आता खासगी पुणेरी बोली आणि जाहीर बोली ह्यातला फरकाचा एक नमुना पहा.
मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. त्यात शुद्ध मराठी या नावाची एक पुणेरी बोली आहे.आता ह्या बोलीमध्ये व्यासपीठावरची पुणेरी,घरातली पुणेरी,दुकानदाराची पुणेरी,ह्यातला फरक नीट समजावून घेतला पाहिजे.आता खासगी पुणेरी बोली आणि जाहीर बोली ह्यातला फरकाचा एक नमुना पहा.
अशी कल्पना करा, कि कोणीतरी एक प्राध्यापक भांबुर्डेकर हे प्राध्यापक येरकुंडकराबद्दल स्वतःच्या घरी बोलताहेत.
''बोंबला! या येरकुंडवारशास्त्र्याचा सत्कार? च्यायला, ह्या येरकुंडकराचा सत्कार म्हणजे कमाल झाली! वास्तविक जोड्याने मारायला हवा याला.ऋग्वेदाचे भाषांतर म्हणे! कमाल आहे! अहो ऋग्वेदाचा बट्ट्याबोळ!! आणि ह्यांना चायला सरकारी अनुदानं,पन्नास-पन्नास हजार रुपये.!''
पुणेरी मराठीतून संताप व्यक्त करायला दुसर्याला मिळालेले पैसे, हा एक भाषिक वैशिष्ठ्याचा नमुना मानावा लागेल.
"ओढा! ओढा लेको पैसे! करा चैन! खा! रोज शिकरण खा! मटार उसळ खा!". अगदी चैनीची परमावादी. पुणेरी मराठीत इकडेच संपते- शिकरण, मटार उसळ वगेरे. "आहो! आहो चक्क वीस-वीस रुपये मिळवले" हे वाक्य वीस वीस लाख मिळवले ह्या ऐटीत उच्चारावे.
"आणि ह्यांचा म्हणे सत्कार करा! ह्यांना श्रीफळे द्या!" पुणेरी मराठीत नारळाला 'श्रीफळ' म्हणतात, आणि चादरीला 'महावस्त्र'
आता ह्याच खासगी पुणेरी बोलीचे जाहीर बोली भाषेतील रुपांतर पहा. हाच प्राध्यापक, ह्याच गुरुवर्य यार्कुंडकरांचा सत्कार.
"गुरुवर्य यार्कुंडकरांचा सत्कार, म्हणजे साक्षात विद्वत्तेच्या सूर्याचा सत्कार! मित्रहो, आजचा दिवस, पुणे महानगराच्या सांस्कॄतिक इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. हे माझे गुरु...म्हणजे मी त्यांना गुरूच मानत आलो आहे, ते मला शिष्य मानतात का नाही, हे मला ठाऊक नाही." इथे हशा. सार्वजनिक पुणेरी मराठी मध्ये, व्यासपीठावरच्या वक्त्यांनी तिसर्या वाक्यात जर हशा मिळवला नाही, तर तो फाउल धरतात. तेव्हा होतकरू पुणेकरांनी जाहीर पुणेरी बोलीचा अभ्यास करताना हे नीट लक्षात ठेवायला पाहिजे.
"आता, एका परीने तसा मी त्यांचा शिष्यच आहे कारण, ते मुन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षक असताना, मी पहिल्या इयत्तेत त्यांचा विद्यार्थी होतो." म्हणजे, येरकुंडकर प्रोफेसर, हा एकेकाळी मुन्सिपाल्टी शाळामास्तर होता, हे जाता जाता ध्वनित करून जायचं.
"त्यांचे तीर्थरूप, सरदार पंचपात्रीकारांच्या वाड्यातील आहार विभागात सेवक होते." म्हणजे तिकडे वाड्यावर स्वयंपाकी होते, हे सांगून मोकळे व्हायचे.
"असो! अत्यंत दारिद्र्यात बालपण घालवल्यानंतर आता अरण्येश्वर कॉलनीतल्या आपल्या प्रशस्त बंगल्यात राहताना प्राध्यापक येरकुंडकरांना किती धन्यता वाटत असेल!" म्हणजे विद्वत्तेच्या नावावर पैसा कसा ओढला बघा! हे आलं त्याच्यामध्ये.
"प्राध्यापक येरकुंडकर, आणि आपले शिक्षण मंत्री, एकाच शाळेत शिकत असल्यापासूनचे स्नेही आहेत."- म्हणजे वशिला कसा लागला!
सार्वजनिक पुणेकर व्हायचे असेल, तर जाहीर पुणेरी मराठीचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागेल.
आता दैनंदिन व्यावहारिक पुणेरी शुद्ध मराठी बोलीला मात्र अनेक पैलू आहेत. त्यामुळे रोजच्या व्यवहारात देखील ही बोली वापरताना, वाक्यरचनेकडे नीट लक्ष द्यायला हवे. आता हेच बघा ना, टेलीफोन रिसीवर उचलल्यानंतर, "हेलो, हेलो", असे म्हणावे, हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे ना? पण पुणेरी शुद्ध मराठीत, "हेलो" याच्या ऐवजी, दुपारच्या झोपेतून जागे केल्यावर आवाजाला जो एक नैसर्गिक तुसडेपणा येत असतो, तो आणून, "हेलो" म्हणण्याच्या ऐवजी "कोणे?" असे वस्कन ओरडायचे. म्हणजे टेलीफोन करण्याप्रमाणे ऐकण्यालादेखील पैसे पडले असते, तर माणूस जसा वैतागला असता, तसे वैतागायचे. मग तिकडून विचारतो कोणीतरी, " आहो, जरा प्लीज गोखल्यांना बोलावता का?" असं विचारलं रे विचारलं की पुण्याबाहेरचे तुम्ही आहात, हे पुणेरी पोर देखील ओळखेल. त्याच्या ऐवजी, "गोखल्यांना बोलवा" असा इथून हुकुम सोडायचा. मग पलीकडून आवाज येतो, "अहो इथे दहा गोखले आहेत! त्यातला कुठला हवाय?"
"तो कितवा तो मला काय ठाऊक! LIC मध्ये झोपा काढायला जातो त्याला बोलवा!!"
मग इकडून आवाज ऐकू येतो, " अरे गणू! इथे तुझ्यासाठी फोनवर कोणीतरी पेटलाय रे!" "च्यायला, ह्या गण्याचे दिवसाला शंभर फोन." हे सुद्धा आपल्याला ऐकू येते.
पुणेकर व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान हवा- नुसता नाही, जाज्ज्वल्य अभिमान. तो शिवछत्रपती किंवा लोकमान्य टिळकांचाच असला पाहिजे, असं मुळीच नाहीये. म्हणजे आपल्या आळीचा गणपती विसर्जनाच्या दिवशी रांगेत कितवा जावा, इथपासून पुणेरी गावरान शेंग ह्या पर्यंत कुठल्याही गोष्टीचा असला तरी चालेल. पण जाज्ज्वल्य अभिमान हवा. मतभेद व्यक्त करायला या जाज्ज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आगरकरांविषयीचा जाज्ज्वल्य अभिमान, क्रिकेटच्या टेस्टच्या वेळी देशीखेळांविषयीचा जाज्ज्वल्य अभिमान- अशी त्या त्या अभिमानाची नीट वाटणी करता येते आपल्याला. आपला मतभेद केवळ खासगी मध्ये व्यक्त करून पुण्याचे संपूर्ण नागरिकत्त्व मिळत नाही. अधून मधून वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये एक पत्र पाठवावे लागते. त्यासाठी पत्रलेखनाची स्वातंत्र्य शैली कमवायची, हे अत्त्यंत आवश्यक आहे.
पुणेकर होण्यासाठी सायकल चालवणं, ही क्रिया एक खास कला म्हणूनच शिकायला हवी. सायकलवर बसता येणं, म्हणजे पुण्यात सायकल चालवता येणं, हे नाही. "चालवणे" इथे हत्त्यार चालवणे, किंवा चळवळ चालवणे, अशा अर्थाने वापरलं पाहिजे. सायकलचा मुख्य उपयोग, वाहन म्हणून न करता वाहत्या रस्त्यात मध्यभागी कोंडाळे करून गप्पा मारताना ’टेकायची सोय’ म्हणून करायला हवी. यातूनच पोलिसांना वाहतूक नियंत्रणाचे शिक्षण मिळते! त्याचप्रमाणे, पाहुणे नामक गनीम येतात, त्यांना वाड्यामध्ये सहजासहजी एकदम प्रवेश मिळू नये, यासाठी मुख्य प्रवेशद्वारात सायकलींची बॅरीकेड रचता यायला हवी. त्या ढिगार्यातून नेमकी आपलीच सायकल बाहेर काढता येयला हवी. सायकल, हे एकट्याने बसून जायचे वाहन आहे, हे विसरायला हवे. किमान तिघांच्या संख्येनी, रस्त्याच्या मधून गप्पा मारत मारत जाता आले पाहिजे. नजर समोर न ठेवता, फुटपथावरील चालत्या-बोलत्या आणि इतर प्रेक्षणीय स्थळांच्या तिथे येणे जाणे चालू असतं तिथे ( --> ) असं पाहिजे. सायकलला घंटी,दिवा, ब्रेक हे वगैरे असणं, हे म्हणजे भ्याडपणाचे लक्षण आहे.
अशा रितीने पुणेकर होण्यातल्या प्रथम, द्वितीय, वगैरे परीक्षा उत्तीर्ण होत होत सार्वजनिक पुणेकर होण्याची पहिली परीक्षा म्हणजे कुठल्यातरी संस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये तिथे शिरायची धडपड सुरु ठेवायची. उगीचच काहीतरी, "श्रीमंत दुसरे बाजीराव साहेब ह्यांचे शुद्धलेखन" किंवा "बाजरीवरील कीड" असल्या फालतू व्याख्यानांना जाऊन सुद्धा हजेरी लावायची,आणि व्याख्यानानंतर, त्या व्याख्यात्याला भेटून "... या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायचीये" , असे चारचौघात म्हणून टाकावे . हा हा म्हणता आपण खासगी पुणेकरातून सार्वजनिक पुणेकर होऊन जाल!
आता पुण्यात राहून दुकान वगैरे चालवायची इच्छा असेल, तर पुणेरी मराठी बोलीचा फारच अभ्यास वाढवायला लागेल. तरच किमान शब्दात गिर्हाईकाचा कमाल अपमान करता येईल. ती भाषा आली पाहिजे. कारण पुण्यात दुकान चालवणे, हे सायकल चालवणे, ह्या अर्थी चालवणे आहे. दुकानदारांनी गिर्हाईकावर सत्ता चालवायची असते. दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते. पुढे ते सिंध्या-बिंध्याला विकावे. जागेच्या पगडीत उरलेल्या आयुष्याची सोय होते, आणि आपण , "महाराष्ट्र व्यापारात मागे का?" या विषयावर भाषण द्यायला मोकळे!
थोडक्यात म्हणजे पुणेकर व्हायचं असेल, तर म्हातारपणाच्या सत्त्काराच्या दिशेने वाटचाल करायचे धोरण सांभाळावे लागते.
...आता तुम्हाला नागपूरकर व्हायचं का? ही तुमची महत्त्वाकांक्षा पार पाडणं अत्यंत सोप्पंय.त्यासाठी एकच अट आहे,म्हणजे तुम्ही नागपुरात राहून चालणार नाही.खरा नागपूरकर हा नागपुरात 'नागपुरी खाक्या' दाखवूच शकत नाही कारण तिथे सगळेच खाक्या दाखवायलाच उत्सुक तर ह्याचा खाक्या कोण बघणार?
जर पुण्या-मुंबईत राहिलात तरच नागपुरी खाक्या दाखवणं शक्य आहे.आपण नागपुरी आहोत एवढं नुसतं ऐकवीत राहायचं बास..हे मुख्य काम.मग ज्या कुठल्या गावी राहत असाल त्याच्या तुलनेनी नागपूर प्रशस्ती चालू ठेवायची.
पानामध्ये कितीही अस्सल तूप पडलेलं असलं तरी वर्हाडी तूप या विषयावरती बोलावं.बिर्याणी खातानासुद्धा 'वडाभाताचा मजा काही और आहे' हे सांगाव.अगदी गुलाबी थंडी जरी पडलेली असली तरी 'नागपुरी उन्हाळा..अरे काय,नागपुरी उन्हाळा...ती संत्री..ते जाळ्याचे पडदे...वगैरे वगैरे' ते ऐकणार्याला त्या थंडीत घाम फुटेपर्यंत ते ऐकवत राहा.हे सगळं नागपूर शहरापासून आपण किमान २०० मैल दूर आहोत हे ध्यानात ठेवून. खुद्द नागपुरात असलं काही बोललात तर ''चूप बे,का उगाच फजूल फुक्या मारून राहिला बे?'' असं लगेच ते विचारतील मग गोंधळ.
...आता तुम्हाला नागपूरकर व्हायचं का? ही तुमची महत्त्वाकांक्षा पार पाडणं अत्यंत सोप्पंय.त्यासाठी एकच अट आहे,म्हणजे तुम्ही नागपुरात राहून चालणार नाही.खरा नागपूरकर हा नागपुरात 'नागपुरी खाक्या' दाखवूच शकत नाही कारण तिथे सगळेच खाक्या दाखवायलाच उत्सुक तर ह्याचा खाक्या कोण बघणार?
जर पुण्या-मुंबईत राहिलात तरच नागपुरी खाक्या दाखवणं शक्य आहे.आपण नागपुरी आहोत एवढं नुसतं ऐकवीत राहायचं बास..हे मुख्य काम.मग ज्या कुठल्या गावी राहत असाल त्याच्या तुलनेनी नागपूर प्रशस्ती चालू ठेवायची.
पानामध्ये कितीही अस्सल तूप पडलेलं असलं तरी वर्हाडी तूप या विषयावरती बोलावं.बिर्याणी खातानासुद्धा 'वडाभाताचा मजा काही और आहे' हे सांगाव.अगदी गुलाबी थंडी जरी पडलेली असली तरी 'नागपुरी उन्हाळा..अरे काय,नागपुरी उन्हाळा...ती संत्री..ते जाळ्याचे पडदे...वगैरे वगैरे' ते ऐकणार्याला त्या थंडीत घाम फुटेपर्यंत ते ऐकवत राहा.हे सगळं नागपूर शहरापासून आपण किमान २०० मैल दूर आहोत हे ध्यानात ठेवून. खुद्द नागपुरात असलं काही बोललात तर ''चूप बे,का उगाच फजूल फुक्या मारून राहिला बे?'' असं लगेच ते विचारतील मग गोंधळ.
नागपूर बाहेरचा माणूस हा रत्नागिरीचा किंवा धुळ्याचा जरी असला तरी त्याला ''तुमच्या पुण्या मुंबईच्या लोकांचा..'' अशा तुकड्यानीच त्या वाक्याला सुरुवात करावी नेहमी.सतत कुणीतरी आपल्याला उपेक्षेनी मारुल राहिलेलं आहे ही भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण स्वतः पाहुण्याला जरी नुसतं कपभर चहा सरकवत असलो ना तरी सुद्धा बोलताना ''तुमच्या पुण्या-मुंबईमध्ये काय बेटी कंजुषी...चहा घ्या..''
किंबहुना नागपुराखेरीज इतर कुठेच खाण्यापिण्याचा शौकच नसतो असा सिद्धांत उराशी बाळगावा.मात्र पदार्थांचा फार तपशील देऊ नका. एखादा गोवेकर नुसत्या बांगड्याचे वीस प्रकार सांगेल आणि तुमच्या वडाभातापुढे तुम्हाला जाता येणार नाही म्हणजे पंचाईत सगळी.अशा वेळेला आपली गाडी संत्री किवा कापूस ह्याच्यावर आणावी.कारण अस्सल मुंबईकर हा संत्र हे एरंडेलाबरोबर खायचं फळ आहे असं मानतो आणि कापूस हा गादीतच तयार होतो आणि आतल्या आत वाढायला लागून एखाद दिवशी गादी फोडून बाहेर येतो अशी त्याची प्रामाणिक समजूत आहे.
अहो प्रत्येक शहरातल्या माणसांचे मोर्चे बांधण्याच्या काय जागा आहेत ते नीट तपासून पाहिलं पाहिजे.मुंबईत तुम्हाला 'आपण नागपूरकर आहोत' हे ठासवायचं असेल ना तर समोरचा माणूस हा नाडकर्णी का धुरंधर आडनावाचा आहे याची खात्री करा आणि सरळ नागपुरी हिंदीच सुरु करा.कारण अस्सल मुंबईकर भुताला भीत नाही इतका हिंदीला भितो.कारण अस्सल नागपूरकर मराठी माणसाची मातृभाषा जशी हिंदी आहे तशी अस्सल मुंबईकर मराठी माणसाची मातृभाषा ही इंग्लिश आहे.मात्र त्या इंग्लिशचा आणि इंग्लंडमधल्या इंग्लिशचा काही संबंध नाही हा.पुण्यातली इंग्रजी मात्र मुळा-मुठेच्या काठी जन्मास येऊन ओंकारेश्वारास तिचे दहन झाले.नागपूरला इंग्रजीची फिकीर करायचं काहीही कारण नाही कारण एका भाषाशास्त्रज्ञाच्या मते पुण्याची इंग्रजी ही संस्कृतोद्भव आहे,नागपूरची हिंदी ही मराठोद्भव आहे आणि मुंबईची मराठी ही आंग्लोद्भव आहे,भाषाशास्त्राचं मत आहे.
आता नागपूरकर होण्यासाठी पान खाणं आवश्यक आहे ही समजूत चुकीची आहे.पान सगळेच खातात,पण आपला नागपुरी अस्सलपणा दाखवायचा असेल तर ज्या पुणेकर किंवा मुंबईकराकडे तुम्ही पाहुणे म्हणून जाणार असाल ना त्याच्या घरी पानाचा इंतेजाम नाही याची खात्री करून ''पान नाही का?'' असं विचारून टाकावं.म्हणजे तो ओशाळतो.आपला एक पॉइंट सर झाला मग ''ठेल्यावरून बोलावून घ्या ना बे''. त्याला ठेला कळत नाही आणि कोणाला बोलवायचं ते कळत नाही.तो ओशाळतो म्हणजे दुसरा पॉइंट सर झाला.''नाई का? मग थोडी सुपारी तर देऊन द्या ना.'' असं म्हटल्याबरोबर तो मसाल्याची सुपारी आणतो लगेच ''हट,ही मसाल्याची सुपारी,ही तर आमच्या नागपुरातली पोट्टी-पाट्टीही खात नाहीत हो,काय हे?'' पुन्हा आउट तो आणि इथून त्यातून एखाद्यानी पान मागवलंच तर मग सरळ खिडकीतून जोरदार पिंक खाली टाकावी.खालच्या भाडेकरूची झालीच रंगपंचमी तर आपण गेल्यावर शिमगा होईल.आपण निश्चिंत असावं आपलं नागपुरीपण सिद्ध झाल्याशी कारण.पण वरून कितीही उद्धटपणा केला तरी आतून मात्र आपण उदार असल्याचा भाव हा चालू ठेवायला पाहिजे.त्यासाठी मुंबईत कोणाही मुंबईकराच्या घरी गेलात आणि तुम्हीही रिटायर होई पर्यंत आणि त्यानंतरही मुंबईतच राहणार असलात तरी ''एकदा आमच्या नागपूरला येऊन जा ना,संत्र्याच्या सीजनला,अरे काय मस्त संत्रे खाऊ,वाळ्या-बिळ्याचे तट्टे-बिट्टे लावून पडले राहू आरामात,आमचा वर्हाडी पाहुणचार तर बघा''.असं आमंत्रण देत जावं.आता मुंबई ते नागपूर प्रवासखर्च जमेला धरला तर मुंबईत संत्री स्वस्त पडतात त्यामुळे ह्या आमंत्रणाचा कोणीही स्वीकार करत नाही काळजी नसावी.
आता नागपूरकर होण्यासाठी पान खाणं आवश्यक आहे ही समजूत चुकीची आहे.पान सगळेच खातात,पण आपला नागपुरी अस्सलपणा दाखवायचा असेल तर ज्या पुणेकर किंवा मुंबईकराकडे तुम्ही पाहुणे म्हणून जाणार असाल ना त्याच्या घरी पानाचा इंतेजाम नाही याची खात्री करून ''पान नाही का?'' असं विचारून टाकावं.म्हणजे तो ओशाळतो.आपला एक पॉइंट सर झाला मग ''ठेल्यावरून बोलावून घ्या ना बे''. त्याला ठेला कळत नाही आणि कोणाला बोलवायचं ते कळत नाही.तो ओशाळतो म्हणजे दुसरा पॉइंट सर झाला.''नाई का? मग थोडी सुपारी तर देऊन द्या ना.'' असं म्हटल्याबरोबर तो मसाल्याची सुपारी आणतो लगेच ''हट,ही मसाल्याची सुपारी,ही तर आमच्या नागपुरातली पोट्टी-पाट्टीही खात नाहीत हो,काय हे?'' पुन्हा आउट तो आणि इथून त्यातून एखाद्यानी पान मागवलंच तर मग सरळ खिडकीतून जोरदार पिंक खाली टाकावी.खालच्या भाडेकरूची झालीच रंगपंचमी तर आपण गेल्यावर शिमगा होईल.आपण निश्चिंत असावं आपलं नागपुरीपण सिद्ध झाल्याशी कारण.पण वरून कितीही उद्धटपणा केला तरी आतून मात्र आपण उदार असल्याचा भाव हा चालू ठेवायला पाहिजे.त्यासाठी मुंबईत कोणाही मुंबईकराच्या घरी गेलात आणि तुम्हीही रिटायर होई पर्यंत आणि त्यानंतरही मुंबईतच राहणार असलात तरी ''एकदा आमच्या नागपूरला येऊन जा ना,संत्र्याच्या सीजनला,अरे काय मस्त संत्रे खाऊ,वाळ्या-बिळ्याचे तट्टे-बिट्टे लावून पडले राहू आरामात,आमचा वर्हाडी पाहुणचार तर बघा''.असं आमंत्रण देत जावं.आता मुंबई ते नागपूर प्रवासखर्च जमेला धरला तर मुंबईत संत्री स्वस्त पडतात त्यामुळे ह्या आमंत्रणाचा कोणीही स्वीकार करत नाही काळजी नसावी.